मुतखडा -(Kidney stone) वेदनादायी आजार, वेळीच काळजी आवश्यक..

Admin

 मुतखडा -(Kidney stone) वेदनादायी आजार, वेळीच काळजी आवश्यक..


मुतखड्याचा हा आजार  पुष्कळ रोग्यांमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे.अयोग्य  आहार, बदललेली जीवन पद्धती , कमी पाणी पिण्याची सवय, लठ्ठपणा यामुळे मुतखडा होऊ शकतो.मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.त्यामुळेच मूतखड्याबद्दल तसेच ते थांबवण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

मुतखडा म्हणजे काय?


लघवीत कँल्शियम औक्झलेट किंवा इतर क्षारकण(Crystals),युरीक ऑसिडचे शरीरात प्रमाण वाढले, एकमेकांच्यात मिसळल्यानंतर काही काळानंतर हळूहळू मुत्रमार्गात कठीण पदार्थ तयार व्हायला लागतात,त्यालाच मुतखडा असे म्हणतात.

मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो?


मुत्रमार्गात होणारा मुतखडा वेगवेगळ्या लांबीचा आणि वेगवेगळ्या आकाराचा असतो. हा रेतीच्या कणाएवढा छोटा किंवा अंडाकार आणि बाहेरून नरम असतात अशा प्रकारच्या खड्यांमुळे कमी वेदना होतात आणि ते सहजपणे नैसर्गिकरित्या लघवीबरोबर बाहेर पडून जातात.काही खडे ओबडधोबड असतात, ज्यामुळे खूप वेदना होतात आणि ते सहजपणे लघवीबरोबर बाहेर पडत नाही .मुतखडा सामान्यतः किडणी,मुत्रवाहिनी आणि मुत्राशायात दिसून येतो.

काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती?

साधारणतः आपल्या लघवीत असलेले काही खास रासायनिक पदार्थ, क्षारकण एकमेकांत मिसळण्यास रोखतात, त्यामुळे मुतखडा बनत नाही.मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते. 

१)पाणी कमी पिण्याची सवय

२)अनुवंशिकतेमुळे मुतखडा होण्याची शक्यता .

३)मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होणे.

४)मूत्रमार्गात अडथळा असणे.

५)व्हीटँमीन सी किंवा कँल्शियम  असलेल्या औषधांचे अधिक सेवन करणे.

६)दीर्घकाळ अंथरूणावर पडून राहाणे.

७)हायपर पँराथायरॉईडीझमचा त्रास असणे.

मुतखड्याची लक्षणे-

सर्वसामान्यपणे मुतखड्याचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात  ३ ते ४ टक्के अधिक दिसून येतो.

अनेक वेळा मूतखड्याचे निदान अचानक होते. ज्या रोग्यांमध्ये मुतखड्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांना ‘सायलेंट स्टोन ‘असे म्हणतात.

पाठ आणि पोटात सतत वेदना होतात.

उलटी येते,मळमळ होते.

लघवीच्या वेळी जळजळ होते.

लघवीतून रक्त जाते.

लघवीत वारंवार संसर्ग होतो.

लाघवी होणे अचानक बंद होते.


मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे-

ह्या वेदना खड्याचे स्थान , आकार,प्रकार आणि लांबी-रुंदीवर अवलंबून असतात.

मुतखड्याची वेदना अचानक सुरु होते. ह्या वेदनेमुळे डोळ्यासमोर तारे चमकू लागतात इतकी ती असह्य असते.

किडनीतील मुतखड्याची वेदना कमरेपासून सुरु होऊन जांघेकडे जाते.

मुत्राशयातील खड्यामुळे जांघ आणि लघवीच्या ठिकाणी वेदना होतात

हि वेदना चालण्या-फिरण्याने किंवा खडबडीत रस्त्यावर वाहनातून प्रवास करताना लागणाऱ्या धक्क्यामुळे अधिक वाढते .

हि वेदना साधारणतः अनेक तास राहते,नंतर आपणहून कमी होते

बहुतेक वेळा हि वेदना अधिक झाल्यामुळे रोग्याला डॉक्टरकडे जावेच लागते आणि वेदना कमी करण्यासाठी औषध किंवा इंजेक्शनची गरज लागते.


मुतखड्यामुळे किडनी खराब होऊ शकते का?

होय. अनेक रोग्यांमध्ये  मुतखडा गोल,अंडाकर आणि चिकट असतो. बहुधा अशा खड्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. असा खडा मुत्रमार्गात अडथळा निर्माण करू शकतो. ज्यामुळे किडनीत तयार झालेली लघवी मुत्रमार्गातून सरळ जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणी फुगते.

जर या खड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत, तर दीर्घकाळ फुगून राहिलेली किडनी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते.अशाप्रकारे किडणी खराब झाल्यानंतर जरी मुतखडा बाहेर काढला तरी किडनी पुन्हा पूर्णपणे काम करेलच याची शक्यता कमी असते.

मुत्रमार्गातील मुतखड्याचे निदान-

मुत्रमार्गाची सोनोग्राफी आणि पोटाच्या एक्सरेच्या मदतीने ह्या खड्याचे निदान केले जाते.

आय.वी.पी.(Intravenous Pyelography)ची तपासणी साधारणपणे हि तपासणी निदानांसाठी आणि ऑपरेशन किंवा दुर्बिणीद्वारे उपचार करण्यापूर्वी केली जाते.

ह्या तपासणीत खड्याची लांबी- रुंदी, आकार आणि स्थानाबाबत योग्य माहिती मिळते, शिवाय किडनीची कार्यक्षमता किती आहेआणि किडणी किती फुगली आहे ह्याबद्दलची देखील माहिती मिळते.

लघवी आणि रक्ताच्या तपासणीद्वारे लघवीतील संसर्ग आणि त्याची तीव्रता तसेच किडनीच्या कार्यक्षमतेबद्दलची माहिती मिळते.


मुत्रमार्गाच्या मुतखड्यावरील उपचार-

खड्यासाठी कुठला उपचार गरजेचा आहे, हे खड्याची लांबी ,त्याचे स्थान होणारा त्रास आणि धोका व्यानात घेऊन निश्चित केले जाते. हा उपचार दोन भागांत विभागता येईल.

१) औषधाद्वारे उपचार (conservative medical treatment)

२) मुत्रमार्गातून खडा काढण्याचे विशिष्ट उपचार (operation ,दुर्बिणी आणि लिथोट्रिप्सी वगैरे )

१) औषधाद्वारे उपचार-

५० टक्यांहून अधिक रुग्णांत खड्याचा आकार छोटा असतो.जो नैसर्गिकरित्या ३ ते ६ आठवड्यात आपणहूनच लघवीबरोबर निघून जातो. ह्या काळात रोग्याला वेदनांपासून आराम मिळण्याकरता आणि खडा लवकर निघण्यासाठी सहाय्यक अशी औषधे दिली जातात.

अ) लिथोट्रिप्स  ( E.S.W.L: Extra Coporeal Shock wave Lihotripsy)

किडनी आणि मुत्रवाहिनीच्या वरील भागात असणारा मुतखडा काढण्याची हि आधुनिक पद्धत आहे.\

या पद्धतीत खास प्रकारच्या लिथोट्रीपटर मशिनच्या सहाय्याने निर्माण केलेल्या शक्तिशाली तरंगाच्या (शॉक  वेब्ज) मदतीने खड्याचा रेतीसारखा चुरा केला जातो, जो काही दिवसात हळूहळू लघवीद्वारे बाहेर पडतो.

फायदे - 

 रोग्याला रुग्णालयात भरती करण्याची गरज नसते.

ऑपरेशन किंवा दुर्बिणीशिवाय , रोग्याला बेशुद्ध न करता मुतखडा काढला जातो.

तोटे-

सर्व प्रकारच्या आणि मोठ्या मुतखड्यांसाठी हि पद्धत परिणामकारक नाही.

खडा काढून टाकण्यासाठी अनेकदा एकापेक्षा जास्तवेळा हा उपचार करावा लागतो.

खडा निघून जाण्यबरोबरच वेदना किंवा अनेकदा लघवीत संसर्गही होऊ शकतो.

मोठ्या खड्यावरील उपचारांमध्ये दुर्बिणीच्या मदतीने किडनी आणि मुत्राशयाच्यामध्ये  विशेष प्रकारची नळी (D.J.STENT)ठेवण्यासाठी गरज पडते.

ब) किडनीतील मूतखड्यावर दुर्बिणीद्वारे उपचार (PCNL/PER Cntaneous Nephro Lithitripsy)

किडनी मधील खडा जेव्हा एक सेमी पेक्षा मोठा असतो,तेव्हा तो काढण्याची हि आधुनिक आणि परिणामकारक पद्धत

ह्या पद्धतीत कमरेवर किडनीच्या बाजूला एक छोटी चीर पाडली जाते. त्यातून किडनी पर्यन्तचा मार्ग तयार केला जातो. ह्या मार्गातून किडनीत जिथे खडा असतो तिथपर्यंत एक नळी घातली जाते.

ह्या नळीतून खडा दिसू शकतो. छोटा खडा चिमट्याच्या मदतीने तर मोठ्या खड्याचा शक्तिशाली तरंगाद्वारे ( Shock Waves) चुरा करून तो बाहेर काढला जातो.

फायदे-

सामान्यपणे पोट फाडून केल्या जाणाऱ्या मुतखड्यावरील ऑपरेशनमध्ये पाठ आणि पोटाच्या भागात १२ ते १५ सेमी लांब चीर पाडावी लागते. पण वर नमूद केलेल्या ह्या आधुनिक पद्तीत केवळ १ सेमी छोटी चीर कमरेवर पाडली जाते.त्यामुळे ऑपरेशननंतर रोगी काही काळातच आपला पूर्वीचा दिनक्रम आचरु शकतो.

क) मूत्राशय आणि मुत्रवाहिनीत असलेल्या मुखड्यावर दुर्बिणीच्या मदतीने उपचार-

मूत्राशय आणि मुत्रवाहिनीत असलेल्या खड्यावरील उपचारासाठी हि उत्तम पद्धत आहे. ह्या पद्धतीत ऑपरेशन किंवा चीर न पडता लघवीच्या मार्गातून (मुत्रनलिका ) विशेष प्रकारच्या दुर्बिणीच्या (Cystoscope आणि Ureteroscope) मदतीने खड्यापर्यंत पोहोचता येते आणि खड्याला “शॉकव्हेव्ह प्रोब “ द्वारे छोट्या कणात तोडून दूर केले जाते.

ड) ऑपरेशन-

मुतखडा जेव्हा मोठा असेल आणि वरील उपचारांनी तो सहज काढणे शक्य नसेल तेव्हा शस्त्रक्रियेद्वारे काढला जातो.

मुतखडा होऊ न देणे टाळणे. 

मुतखडा एकदा नैसर्गिक रुपात किंवा उपचारांद्वारे निघून गेल्यानंतर या आजारापासून संपूर्णपणे मुक्ती मिळते का?

नाही . ज्या रोग्याला एकदा मुतखडा झाला असेल त्याला पुन्हा तो होण्याची शक्यता ८०%असते. त्यामुळे प्रत्येक रोग्याने सावध राहणे गरजेचे असते.


पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून रोग्याने कुठली काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे?

मुतखड्याच्या आजारात आहारनियंत्रण विशेष महत्वाचे आहे. पुन्हा मुतखडा होऊ नये अशी इच्छा बाळगणाऱ्या रोग्यांनी पुढील सल्ल्यांचे लक्षपूर्वक पालन केले पाहिजे.
१)जास्त प्रमाणात पाणी पिणे.

तीन लिटर किंवा १२ ते १४ ग्लासांपेक्षा जास्त प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ दररोज घेतले पाहिजेत.हा मुतखडा बनणे थांबवण्याचा सर्वात महत्वाचा उपाय आहे.

२)खडा बनणे थांबवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा किंवा द्रवाच्या प्रकारांपेक्षा दररोज घेतले जाणारे एकूण प्रमाण अधिक महत्वपूर्ण आहे.

मुतखडा बनणे थांबवण्यासाठी किती पाणी प्यायला , यापेक्षा किती प्रमाणात लघवी झाली आहे,हे अधिक महत्वाचे आहे.

३) दररोज २ लिटरपेक्षा जास्त लघवी होईल एवढे पाणी पिणे जास्त गरजेचे आहे.

पूर्ण दिवस पाण्याएवढी स्वच्छ लघवी होत असेल,तर ह्याचा अर्थ पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला आहे असा होतो. पिवळ्या रंगाची दाट लघवी होणे हे पाणी कमी प्रमाणात  प्यायल्याचे लक्षण आहे.

४)पाण्याशिवाय नारळपाणी,जवाचे पाणी,सर्वात पातळ ताक,बिनमिठाचा सोडा,लेमन ह्यासारखे इतर द्रवपदार्थ जास्त घेतले पाहिजेत.

दिवसाच्या ज्या विशिष्ट वेळेत लघवी कमी आणि दाटपिवळी बनते त्यावेळी लघवीत क्षारांचे प्रमाण जास्त होत असल्याने मुतखडा बनण्याची प्रक्रिया खूप लवकर सुरु होते. ती थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. मुतखडा बनण्याचे थांबवण्यासाठी ,न विसरता,जेवण झाल्यानंतर तीन तासादरम्यान ,जास्त श्रम पडणारे काम केल्यानंतर त्वरित रात्री झोपण्यापूर्वी तसेच मध्यरात्री उठून दोन ग्लास किंवा अधिक पाणी पिणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे दिवसाच्या ज्या वेळेत मुतखडा बनण्याचा धोका अधिक असेल, त्यावेळी जास्त पाणी आणि तरल पदार्थ पिण्यामुळे पातळ,साफ आणि जास्त प्रमाणात लघवी बनते. त्यामुळे मुतखडा होणे टाळता येते.

५)आहार नियंत्रण-

मुतखड्याचे प्रकार लक्षात घेऊन खाण्यात पूर्ण दक्षता आणि पथ्य पाळण्यास मुतखडा होणे थांबवण्यात मदत मिळू शकते.

६)जेवणात मीठ कमी घेणे तसेच खरात पदार्थ , पापड,लोणची यांसारखे जास्त मीठ असलेले खाद्यपदार्थ खाता कामा नयेत.

७)लिंबूपाणी, नारळपाणी, मोसंबीचा रस , अननसाचा रस, गाजर, कारले, बिया काढून घेतलेल्या टोमँटोचा रस, केळी, जवस, बदाम इत्यादीचे सेवन मुतखडा न होण्यास मदत करतात. म्हणून त्याचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

८)मुतखड्याच्या रोग्यांनी दुधाच्या पदार्थाचे (जे जास्त प्रमाणात कँल्शियम युक्त असतात) सेवन करता कामा नये ,हि समजूत चुकीची आहे. खाण्यात योग्य प्रमाणात घेतलेला कँल्शियम  त्या खाद्य पदार्थाच्या आॉक्झीलेट बरोबर जोडला जातो.यामुळे आॉक्झीलेटचे शोषण कमी होते आणि मुतखडा होण्यापासून अटकाव होतो.

९)विटँमीन सी जास्त प्रमाणात (४ ग्रँम हून अधिक )घेऊ नये

१०)आॉक्झीलेटवाल्या मुतखड्यासाठीचे पथ्य

खाली दिलेले आॉक्झीलेटयुक्त खाद्य पदार्थ कमी खावेत.

भाज्या- टोमँटो,भेंडी,वांगी,काकडी,पालक,चवळी

फळे- चिकू,आवळे,द्राक्ष,स्ट्रॉबेरी ,काजू

द्रवपदार्थ – कडक चहा,द्राक्षांचा रस,कँडबरी ,कोको, चॉकलेट, थम्सअप , पेप्सी ,कोका कोला.

११)युरीक अँसिड मूतखड्यासाठी पथ्य-

ज्यामुळे युरीक अँसिड वाढू शकते असे पुढील खाद्यपदार्थ अत्यंत कमी प्रमाणात खावेत.

ब्रेड, होल व्हीट ब्रेड

डाळी,मसूर डाळ

भाज्या- फ्लॉवर,वांगी,पालक,मश्रूम

फळे – चिकू,सीताफळ

मांसाहार – मांस,कोंबडी,मासे,अंडी

बियर, दारू

औषध उपचार-

ज्या रोग्यांच्या लघवीत कँल्शीयमचे प्रमाण जास्त असते अशा रोग्यांना थायझाइड्स आणि सायट्रेटचे प्रमाण जास्त असते अशा रोग्यांना थायझाइड्स आणि सायट्रेटचे प्रमाण असलेली औषधे दिली जातात.

युरीक अँसिडवाल्या मुतखड्याच्या रोगात अँलोप्युरीनॉल ( Allopurinol) आणि लघवीला क्षारयुक्त बनवणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो.

नियमित तपासणी-


मुतखडा स्वतःहून पडल्यास किंवा उपचारांनी काढल्यानंतरही पुन्हा होण्याची भीती बहुतांशी रोग्यात असते आणि काही रोग्यांना मुतखडा असूनही त्याची लक्षणे दिसत नाहीत किंवा ती न दिसण्यासारखी असतात. म्हणूनच कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी , डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक वर्षी सोनोग्राफी करून घेणे आवश्यक आहे. सोनोग्राफीमध्ये मुतखडा नसल्याची खात्री करता येते किंवा प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान होऊ शकते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top