पावसामुळे हवामानात बदल झाला, असून ताप, सर्दी, खोकल्याची साथ आली आहे. त्याबरोबर विषाणूजन्य संसर्गामुळे डोळ्याची साथ आली आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ही साथ पसरत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे येणे हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ अनेकदा आलेली आढळते. डोळे येणे या आजाराला इंग्रजीत पिंकआय किंवा कॉन्जुक्टीव्हिटीज असे म्हणतात. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ येते.
डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अँडिनो व्हायरसमुळे होतो. हा संसर्ग सौम्य किंवा तीव्र प्रकारचा असू शकतो. तरीही सर्वांनी काळजी घेण्याची गरज असते. विशेष करून हा आजार संसर्गित व्यक्तीने हाताळलेल्या वस्तूंना निरोगी व्यक्तीचा संपर्क झाल्यास हा आजार पसरू शकतो.
त्यामुळे डोळ्याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे पेन, रुमाल, टॉवेल, मोबाईल अशा वस्तू हाताळल्यावर पसरू शकतो. म्हणून त्यांना स्पर्श करू नये. डोळे येण्याची काही प्रमुख लक्षणे सांगता येतील. डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्या सुजणे, डोळ्यात टोचणे किंवा कचकचणे अशी लक्षणे याशिवाय डोळ्यांना सूज येणे.
त्याचप्रमाणे केमिकल्स, दूषित वायू, अल्ट्राव्हायोलेट किरण यांच्या संपर्कात आल्याने सुद्धा डोळे येऊ शकतात. तसेच उजेड सहन न होणे, डोळ्यातून सुरुवातीला पाणी व नंतर चिकट घाण येणे, डोळ्याच्या पापण्या चिकटणे. अशी लक्षणे साधारणपणे डोळे आल्याचे आपल्याला जाणवतात.
वरील लक्षणे दिसून येताच आपण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे. यामध्ये बाधित व्यक्तीचा संपर्क कमी करावा. तसेच नियमित हात धुणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे. डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवून चष्म्याचा वापर करणे. कचऱ्यावर माशा बसतात आणि त्या डोळ्यांची साथ पसरवतात म्हणून परिसर स्वच्छ ठेवावा. डोळे आलेल्या व्यक्तीचा हात रुमाल, टॉवेल इत्यादींचा वापर करू नये. ही सर्व काळजी घेतली असता डोळे येण्याच्या संसर्गापासून आपण सुरक्षित राहू शकतो. डोळे येणे हा त्रास दोन-तीन दिवसात कमी होत असतो मात्र जास्त स्वरूप त्याचे असल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषध उपचार घेणे गरजेचे ठरते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.