" सामाजिक कार्यात स्वयंप्रेरणा हवी ” : साथी संजय बनसोडे

Admin

  "  सामाजिक कार्यात स्वयंप्रेरणा हवी "  : साथी संजय बनसोडे

इस्लामपूर प्रतिनिधी : ता.१२

        “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  विवेकवाद व विज्ञाननिष्ठेला वाहून घेतलेली चळवळ आहे. जादूटोणाविरोधी  व जात पंचायत विरोधी कायदा तिचे तिचे फलित आहे. अंनिसचे अनेक उपक्रम समाजाच्या विविध थरांना जोडून घेतात.” असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सांगली कार्यकर्ता नियोजन बैठकीत ते बोलत होते .   अध्यक्षस्थानी     ज्येष्ठ    कार्यकर्ते विजयकुमार जोके  होते. साथी बनसोडे पुढे म्हणाले, “राज्याच्या सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम सुरू आहेत. हसत खेळत विज्ञान, जोडीदाराची विवेकी निवड, विवेकवाहिनी, मानसिक आरोग्य,  चला व्यसनाला बदनाम करू या असे अनेक उपक्रम राबविले जातात. प्रतिकूल वातावरणातही उपक्रम उत्साहाने सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील गरजेनुसार उपक्रम घेण्यास प्राधान्य द्यावे एक एक माणूस जोडत जावे. गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा मार्ग पुढे नेण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे. शाखा भेटी देऊन कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनात्मक शिबिर घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जनजागृती करूया. इतिहासाने हिटलर, मुसोलिनी यांच्या राजवटी उलथून टाकल्या, इतिहास पराक्रमी व सत्यनिष्ठ व्यक्तींच्या पाठीशी राहतो ही साक्ष आहे.”

    अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्राचार्य डॉ. नितीन शिंदे म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सध्या काळाची गरज आहे. संत ,समाजसुधारकांचा वारसा व संविधानिक मूल्ये अंनिस राबविते. पत्रिकेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा सामाजिक समतेचा विचार पोहोचविला जातो.”

      ज्येष्ठ कार्यकर्ते विजयकुमार जोके  मार्गदर्शन करताना म्हणाले. “विवेकाची एक पणती लाखो मशाली पेटविते. आपण कार्यकर्त्यांनी लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचे काम केले पाहिजे.”

  जिल्हा प्रधान सचिव डॉ.राम घुले यांनी राज्य कार्यकारणी बैठक शहाड जिल्हा ठाणे येथे झालेल्या बैठकीचा कार्य वृत्तांत सादर केला. ते म्हणाले, “आपल्या परिसरातील भोंदू बाबांची व अंधश्रद्धा होणाऱ्या ठिकाणांची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे  अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणास प्रतिबंध करणे शक्य होईल.” 


       सांगली जिल्हा कार्याध्यक्ष प्रो.डॉ. किशोर गावडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.  प्रोफेसर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंनिसचे कार्यकर्ते प्रतीक व सानिका यांनी लग्नप्रसंगी मुहूर्तमेढ विधवांच्या हस्ते करून एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

      यावेळी ‘निंबू मिरची हटाओ-लटकती काली गुडिया जलाओ” हे अंधश्रद्धा दूर करणारे अभियान सांगली जिल्ह्यात राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

         कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधन गीत व दाभोलकर अभिवादन गीताने करण्यात आली. युवा कार्यकर्ते अनिकेत अंगवणे यांनी  आभार मानले.

        बैठकीस ॲड. सुहास माळी, साध्वी हाके, डॉ. सुभाष जानराव डॉ. भगवान मिणचेकर, डॉ. केशव टिपरसे, दीपक खरात,डॉ. नीता जोके, पत्रकार सचिन पाटील,  अनिकेत अंगवणे, अजय भालकर, अरबाज पटेल, अमृत काळे, भास्कर सदाकळे, तानाजी गायकवाड, बी .आर .संकपाळ, सचिन पाटील, सानिका पाटील, प्रतीक ढेरे- पाटील, मोहनराव जाधव, आझाद जमादार, आरती अनिता वैभव, वैष्णवी खोत,दीपिका शिंदे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top