नवीन शिक्षक संच मान्यता निकषांच्या परिपत्रकाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विरोध, शालेय शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर यांना दिले निवेदन

Admin

 नवीन शिक्षक संच मान्यता  निकषांच्या परिपत्रकाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विरोध, शालेय शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर यांना दिले निवेदन. 


सिंधुदुर्ग प्रतिनिधी - नुकताच १५ मार्च २०२४ रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संच मान्यता मिळवण्यासाठी नवीन निकषांचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाला, शासन निर्णयाला कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने विरोध दर्शवला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा याचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राज्याध्यक्ष आकाश तांबे व पदाधिकारी यांनी भेट घेऊन दिले.


 या परिपत्रकानुसार संच मान्यता शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ पासून अंमल बजावणी केली जाणार आहे. या निर्णयानुसार द्विशिक्षकी शाळेत तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान ७६विद्यार्थी आवश्यक असणार आहेत. १ ते २० पटाच्या शाळेत दोन शिक्षक असणार मात्र एक नियमित व दुसरा सेवानिवृत्त शिक्षक, यापुढे पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एक शिक्षक असेल मात्र तोही सेवानिवृत्ती शिक्षकांमधून नेमणार तो उपलब्ध झाला नाही तर नियमित शिक्षक असेल, इ. ६वी ते ८वी मध्ये एकच वर्ग असल्यास ३५ पटा पर्यंत एक शिक्षक, ५३ पटापर्यंत दुसरा व तिसरा शिक्षक नेमण्यासाठी किमान ८८ पट आवश्यक आहे. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इ. १ली ते ५ वी किंवा इ. १ ली ते ७वी/८वी चा एकूण पट १५० असावा लागणार आहे. मात्र जुन्या शाळेत पद संरक्षित करण्यासाठी १३५ पट टिकवावा लागणार आहे. 

यासारख्या अनेक जाचक अटी या परिपत्रकात असल्याने याची अंमलबजावणी झाल्यास अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा, कमी पटाच्या शाळा बंद होण्याचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढली जाणार आहे. तसेच राज्यातील वंचित, कष्टकरी, बहुजनांना शिक्षणापासून दूर करू पाहणारे आहे. असे निवेदनात म्हटले आहे. तरी हा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top