भारतरत्न, थोर शिक्षणतज्ञ, विचारवंत, माजी उपराष्ट्रपती, राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

Admin

 भारतरत्न, थोर शिक्षणतज्ञ, विचारवंत, माजी उपराष्ट्रपती, राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.


 

    विवेक वार्ता सांगली - एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाच फूट अकरा इंच उंची, बारीक सडपातळ बांधा, गंभीर तेजस्वी मुद्रा, सोनेरी चौकटीचा चष्मा, त्यातून चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, भव्य कपाळ, त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा, तलम पांढरे पण काहीसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, संपूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् !!! 

अत्यंत बुद्धिमान  व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, , अशा थोर व्यक्तीचा परिचय करून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही. 

भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यात चित्तूर प्रांतात, तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये एका मध्यमवर्गीय  तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील  तहसीलदार होते.

घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच; पण कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. राधाकृष्णन् यांच्या आयुष्याचा बालपणीचा काळ तिरुत्ताणी या गावात गेला. 

लहानपणी मुले खेळण्यात रमतात, समवयस्क मुलांच्यात मिसळतात, दंगा करतात, गप्पा मारतात, भांडतात, एकटेपणाला घाबरतात, कंटाळतात; पण राधाकृष्णन् मात्र याला अपवाद होते. त्यांना मुलांच्यात मिसळायला, खेळायला आवडत नसे. ते ते एकांतप्रिय व शांतताप्रिय होते. जेव्हापासून त्यांना वाचता येऊ लागले, तेव्हापासून ते वाचनात रममाण होऊ लागले. विविध विषयांवरील पुस्तके वाचणे हाच त्यांचा छंद बनला. ग्रंथ हेच त्यांचे जिवलग मित्र, गुरू बनले. वाचन, मनन, चिंतन यामुळे ते अधिक गंभीर व अंतर्मुख बनले.

राधाकृष्णन् यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी येथे झाले. गाव लहान असल्यामुळे पुढील शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून पुढील शिक्षणासाठी त्यांना तिरुपती येथील ‘लूथरन मिशन हायस्कूल’मध्ये घालण्यात आले. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी ते मिशन हायस्कूलमध्ये शिकू लागले.  राधाकृष्णन् यांचे वाचन अफाट होते. गाढा अभ्यास होता. 


पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी राधाकृष्णन् मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी वेलोरच्या ह्यूरिस कॉलेज’मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. लवकरच ते एफ्. वाय.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यापुढील शिक्षणासाठी त्यांनी मद्रास येथील ‘ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश घेतला. पदवी परीक्षेसाठी त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ हा विषय निवडला. तत्त्वज्ञान हा विषय अवघड असूनही त्यांनी तो निवडला; कारण त्यांना या विषयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. नंतर ते बी. ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी हा विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त राधाकृष्णन्नच उत्तीर्ण झाले. या परीक्षेतील नेत्रदीपक यशामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक वाढला.

राधाकृष्णन् यांनी एम. ए. साठी तत्त्वज्ञान’ हाच  

विषय निवडला. 

राधाकृष्णन् यांनी बी. ए. आणि एम्. ए. या  परीक्षांमध्ये सुवर्णपदके मिळविली. इतकेच नाही तर कॉलेजमध्ये दाखल झाल्यापासून ते थेट एम. ए. होईपर्यंत सर्व बक्षिसे, पदके व शिष्यवृत्त्या त्यांनी मिळविल्या. असे होते त्यांचे शैक्षणिक जीवन.

राधाकृष्णन् यांना एम्. ए. ची पदवी मिळताच मद्रास येथील ‘प्रेसिडेंसी कॉलेजा’त तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी अध्यापनकार्य अत्यंत निष्ठेने केले. 

राधाकृष्णन् यांच्या यशाची कमान उंचावत गेली. कलकत्ता विश्वविद्यालयात प्रोफेसर ऑफ मेंटल अँड मॉरल सायन्स’ या उच्चपदावर त्यांची निवड व नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी सुमारे दहा वर्षे काम केले.

 पुढे त्यांनी ‘समकालीन तत्त्वज्ञानामध्ये धर्माचे स्थान’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात पाश्चिमात्य विचार आणि उपनिषदे यांची तौलनिक मीमांसा केली आहे. या ग्रंथाच्या आधी त्यांचा ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला होता.


राधाकृष्णन् हे पट्टीचे वक्ते असल्याने त्यांना ‘केंब्रिज विद्यापीठा’ने व्याख्यानासाठी आमंत्रित केले. ऑक्सफर्डच्या ‘ऑप्टन व्याख्यानमालेतही व्याख्यान देण्याचा मान मिळाला. 

नंतरच्या कालावधीत ते आंध्र विश्वविद्यालया’चे उपकुलगुरू म्हणून कार्यरत होते. जिनिव्हा येथील ‘लीग नेशन्स्’ ह्या संस्थेचा ‘बौद्धिक सहकार्य समिती’ च्या उपसमितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आंध्र विद्यापीठाने त्यांचा आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञ’ म्हणून गौरव करून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. 

इ. स. १९४२ साली चलेजाव’चा ठराव झाला. देशात क्रांतीचे वारे वाहू लागले. सभा होऊ लागल्या. मिरवणुका निघू लागल्या. महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांचे सळसळते रक्त त्यांना स्वस्थ बसू देईना. क्रांतिपर्वात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. इंग्रज सरकार अशा क्रांतिकारकांना मारत असत आणि पकडून जेलबंद करीत असे. या गोष्टींपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् प्रयत्नशील असत. विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले नाही, तरी ते विद्यार्थ्यांवर कधीच रागावत नसत. उलट त्यांना त्रास होऊ नये म्हणून सतत त्यांच्याबरोबर राहत असत. डॉ. राधाकृष्णन् हे सामाजिक, धार्मिक, प्रश्नांवर जेवढे बोलत, तेवढे प्रचलित राजकीय प्रश्नांवर बोलत नसत. राजकारण व संस्कृती यांची भेसळ करणे अत्यंत धोक्याचे आहे. राजकारणापेक्षा संस्कृती कितीतरी श्रेष्ठ आहे. संस्कृतीमध्ये चिरंतन मूल्ये असतात; तर राजकारण क्षणिक व चंचल असते. संस्कृतीचा संबंध मानवी मनाशी व आत्म्याशी पोहोचतो. राजकीय सामर्थ्याच्या बळावर शंभर विद्वानांना वेठीस धरता आले, तरी राजकारणी मनुष्य आणि संस्कृतिसंपन्न मनुष्य यांची स्थाने भिन्न आहेत.” आजच्या . राजकारणी लोकांसाठी हा विचार किती महत्त्वाचा आहे, हे जाणवते.

डॉ. राधाकृष्णन् यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया होता; त्याचमुळे त्यांच्यापाशी नम्रता व सौजन्य हे गुण होते. ह्या गुणांसाठी ते प्रसिद्ध होते; त्याचमुळे त्यांनी जगात लौकिक मिळविला होता.

स्त्री व पुरुष ही समाजरथाची दोन चाके आहेत. म्हणूनच स्त्री व पुरुष यांच्यात समानता असली पाहिजे, असे त्यांचे मत होते. याचसाठी स्त्रियांना समाजात योग्य तो मान मिळाला पाहिजे, असे त्यांचे मत ते ठामपणे मांडत असत.

त्यांच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या उज्वल राजकीय कालखंडास सुरुवात झाली. पदवीधर झाल्यापासून अनेक अधिकाधिक मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या स्वयंसिद्ध गुणांमुळे त्यांची कीर्ती वाढत गेली. त्यांच्यातील गुण प्रकाशात आणण्याचे काम केले युनेस्कोने. युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे संपूर्ण नाव आहे ‘युनायटेड नेशन्स् एज्युकेशनल अॅण्ड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन’या संघटनेची सुरुवात झाली आणि डॉ. राधाकृष्णन् यांनी या संघटनेत भारताचे प्रतिनिधित्व केले.  पुढे त्यांना ‘युनेस्को’चे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

डॉ. राधाकृष्णन् यांचे युनोसंबंधीचे मत होते की, सर्वांना समान संधी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. नुसते उच्च ध्येय असून चालत नाही; तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तशी साधनेदेखील हवीत आणि त्याचसाठी यूनो’चा जन्म झाला आहे. राष्ट्राराष्ट्रात शांतता, सामंजस्य हवे; युद्ध नको. सर्व राष्ट्रांना संरक्षण, न्याय व स्वातंत्र्य देण्यासाठी ही संस्था आहे.  अमेरिकेतील हॉवर्ड विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही बहुमानाची पदवी देऊन त्यांचा गौरव केला. या गौरवामुळे भारताचाही गौरव झाला.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचे महत्त्व पं. जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे वाढत होते; तर भारताच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची पताका जगभरात फडकविण्याचे काम डॉ. राधाकृष्णन् करीत होते. ज्या ज्या देशात डॉ. राधाकृष्णन् गेले, त्या त्या देशाने त्यांचा सन्मान केला. जर्मनीचे सर्वात मानाचे चिन्ह श्रेष्ठ गुणवत्ता’ त्यांना बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला. जर्मनीने इतरही अनेक मानसन्मान त्यांना दिले. एवढेच नव्हे, तर ‘शांतता पारितोषिक देऊन त्यांचा बहुमान केला.


त्यानंतर डॉ. राधाकृष्णन् यांनी अमेरिका, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रशिया, बल्गेरिया, आफ्रिका, चीन, मंगोलिया, हाँगकाँग, इ. देश व शहरे यांना भेटी दिल्या. 

जागतिक कीर्ती मिळविणारे थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ विचारवंत, दीर्घानुभवी शिक्षणतज्ज्ञ, महान पंडित डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपल्या मायभूमीची बहुमोल सेवा केली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने त्यांचा ‘भारतरत्न’ हा सवोच्च मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

१९५५ साली डॉ. राधाकृष्णन् यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानदर्शक किताब मिळाला. 

१३ मे १९६२ पासून डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मद्रास येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “जगात ज्ञान आणि विज्ञान झपाट्याने वाढत चालले आहे, पण ज्ञानाबरोबर सौजन्याची किंवा शहाणपणाची वाढ होत गेली नाही, तर तारक ज्ञान मारक ठरते. अनिष्ट व विध्वंसक प्रवृत्ती माणसामध्ये कधीपासून वास करीत आल्या आहेत.

ज्ञानाच्या बळावर या विध्वंसाची महान आणि भयानक साधने त्याने आता शोधून काढली आहेत. नवीन विद्येचा सदुपयोग करण्याइतके सौजन्य माणसात पैदा झालेले नसेल, तर जगाचे भवितव्य अंध:कारमय आहे, असे म्हणावयास हरकत नाही. त्यांचे हे विचार शिलालेखावर कोरून ठेवण्यासारखे अमूल्य  आहेत. 

डॉ. राधाकृष्णन युद्ध करणे पसंत यांना नव्हते. ‘शांतता शांतता’ म्हणून नुसते ओरडण्यापेक्षा युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. सध्याच्या कारभारात काही तरी उणीव आहे आणि ती उणीव भरून काढल्याशिवाय लढाया होणे थांबणार नाही की जगात शांतता नांदणार नाही. मनुष्यप्राण्याचा योग्य तो दर्जा ओळखणे, कबूल करणे, हेच लोकशाहीचे मुख्य तत्त्व असले पाहिजे.

डॉ. राधाकृष्णन् यांच्याच कारकीर्दीत पंचशील तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या आमच्या शेजारच्या राष्ट्राने भारतावर आक्रमण करून शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रपती या नात्याने त्यांनी नभोवाणीवर भाषण करून भारतीय जनतेला धीर दिला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे एक महान लेखक होते. त्यांनी जवळजवळ १५-१६ ग्रंथ लिहिले. त्यातील बरेच ग्रंथ जागतिक कीर्तीचे बनले. त्यांचे ‘रिलिजन इन वेस्टर्न थॉट’ हे पुस्तक प्रकाशित झाले व ते जगभर गाजले.

याशिवाय त्यांनी तत्त्वज्ञान व धर्म’ या विषयांवर अनेक लेख लिहिले. ‘माइंड’ च्या आंग्ल मासिकातून त्यांचे किती तरी लेख प्रसिद्ध झाले. तत्त्वज्ञानावरील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय आहेत. त्यांच्या पुस्तकांचे पाश्चात्य देशांत खूपच कौतुक झाले. जे. एच्. म्युरहेड, जे. एस्. मॅकेंझी यांनी त्यांची स्तुती केलेली आहे.

उपनिषदांतील तत्त्वज्ञान’ व ‘हिंदी तत्त्वज्ञान’ या पुस्तकांनी कीर्तीचा कळस गाठला. हॉवर्ड येथील तत्त्वज्ञान परिषदेत त्यांनी ‘आधुनिक सुधारणेतील आध्यात्मिक उणीव’ या विषयावरील दिलेल्या व्याख्यानांचे पुस्तक ‘कल्की’ या नावाने प्रसिद्ध झाले.

 महाविद्यालयात काही वर्षे अध्यापनाचे काम करून ते अखिल विश्वाचेच शिक्षक बनले. भारतीय शिक्षणकार्यामध्ये त्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली. शिक्षक कसा असावा, याचा आदर्श घालून दिला. म्हणूनच ‘नॅशनल टीचर्स फाउंडेशन’ने पुढाकार घेऊन डॉ. राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन म्हणून निवडला. 

डॉ. राधाकृष्णन् यांच्यासारखे तत्त्वचिंतकच समाजाचे खरे शिक्षक होण्यास योग्य आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षकाने भावी नागरिकांच्या जीवनाला विधायक वळण दिले पाहिजे. त्या दृष्टीने आदर्श ठरणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा, त्यांच्या भरीव कार्याचा गौरव करण्याची सरकारने योजना आखली आहे.


५ सप्टेंबरला भारतात पाळण्यात येणारा शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांबद्दलच्या समाजाच्या ऋणाची जाणीव. शिक्षक आपल्या जवळचे ज्ञानभांडार शिष्यांपुढे खुले करतो. निरपेक्ष बुद्धीने तो ज्ञानाचीच उपासना करीत असतो. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हे तो विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवतो. ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी आहेत, त्याचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव व्हावा, ही यामागची भूमिका. 

  ज्यांच्या अंगी त्याग आणि सेवावृत्ती आहे, तेच खरे साधू व तेच खरे संत. देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व काही देतो, तो कृतार्थ होतो. त्यागातच खरे वैभव आहे. संचयात नाही.

आपण पक्ष्याप्रमाणे विहार करावयास शिकलो, माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसांप्रमाणे जगात वावरण्यास शिकलो नाही.

असा हा भारतीय संस्कृतीचा उपासक म्हणजे भारतमातेचा लाडका सुपुत्र राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होताच मद्रासला गेला आणि अखंड वाचन लेखनात मग्न झाला, संपूर्ण जीवन ज्ञानयज्ञासाठी समर्पित केले आणि कृतार्थ जीवन जगले.

   २४ एप्रिल १९७५ रोजी डॉ. राधाकृष्णन् अनंतात विलीन झाले. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top