जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणूकी ऐवजी टीईटी पात्र शिक्षकांना संधी द्यावी.- गौतम वर्धन , प्रमोद काकडे यांची मागणी

Admin
जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणूकी ऐवजी टीईटी पात्र शिक्षकांना संधी द्यावी. -
गौतम वर्धन, प्रमोद काकडे यांची मागणी

सांगली - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी नवीन शिक्षक भरती अंतर्गत डीएड, बीएड, टीईटी पात्र युवा शिक्षकांना संधी देण्याची मागणी, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन व सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केली आहे. डीएड, बीएड, टीईटी पात्र बेरोजगार तरुण शिक्षकांना संधी मिळाली तर बेरोजगारीचे प्रमाण कमी
होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता पवित्र प्रणाली द्वारे नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत मानधन तत्वावर सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदे भरण्याऐवजी टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्यांची मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने काढलेले परिपत्रक तात्काळ मागे घेऊन तिथे डीएड, बीएड, टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती प्राधान्याने करावी व सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावरची नियुक्ती रद्द करावी.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा होत असला तरी शारीरिक दृष्ट्या ते क्रियाशील असतीलच असे नाही. त्यामुळे तरुण शिक्षकांप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक कामकाज करू शकणार नाहीत. तसेच हा निर्णय म्हणजे डीएड, बीएड असणाऱ्या लक्षावधी उमेदवारांचा रोजगार हिरावून घेणारा आणि गुणवत्ता संवर्धनाच्या कामात अडथळा निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षण उध्वस्त करणारा आहे. याचे विपरीत परिणाम गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, कामकरी, शेतमजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होणार आहे म्हणून सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपाची भरती ऐवजी युवकांच्या हाताला रोजगार देण्याचे धोरण लक्षात घेता या पदावर डीएड,बीएड, टीईटी, परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची प्राधान्याने नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सर्व शिक्षक संघटना एकत्रितपणे आंदोलन  करतील असा इशारा देण्यात येत आहे असे सांगितले . 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top