वातावरणातील बदल सांभाळा... ताप येऊ शकतो...

Admin
वातावरणातील बदल सांभाळा... ताप येऊ शकतो...
  पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो. ज्याप्रमाणे माणसाला राग आल्याशिवाय लढाई होत नाही, त्याचप्रमाणे ताप आल्याशिवाय शरीरातील जंतूंशी लढाई होत नाही. ताप बहुदा जंतुदोषमुळे, जंतूसंसर्ग झाल्याने येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणाऱ्या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्रावर क्रिया होऊन आपल्याला ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना प्रचंड वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यकच आहे. शरीराच्या तापमानाप्रमाणे नाडीचे ठोके  वाढत जातात. प्रति मिनिट दहाने ते वाढत जातात. साधारणपणे एक डिग्री फॅरेनहाईटने ताप वाढला, की हे ठोके प्रती मिनिट दहाने वाढतात. नाडीचा हा अपेक्षित दर एक दोन अपवाद सोडतात सर्व आजारांमध्ये दिसून येतो. अपवाद म्हणजे विषमज्वर कावीळ आणि मेंदूच्या आवरणाची सूज या तीन आजारांमध्ये अपेक्षित असल्यापेक्षा नाडीचा वेग कमीच असतो. शरीरात रक्तातल्या पांढऱ्या पेशींची रोगजंतू विरुद्धची लढाई चालू असते. या लढाईतून निघणाऱ्या विषारी पदार्थांमुळे ताप हा चढत असतो.
   ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो. बारीक ताप असेल तर ताप उतरण्याची आवश्यकता नसते. मात्र ताप जास्त असेल तर मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक ठरते. आपल्या घरी तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते. ताप मोजण्यासाठी थर्मामीटर चा उपयोग करावा लागतो. 100 च्या वर 103 पर्यंत मध्यम ताप समजला जातो. 103 व त्यापुढे ताप असेल  तर जास्त ताप मानले जाते. जास्त ताप आला असेल तर विषमज्वर, न्यूमोनिया, मेंदू सूज किंवा मूत्रमार्ग दाह यापैकी आजारांची शक्यता असते. जास्त ताप असल्यास रुग्णास ताबडतोब तज्ञांकडे पाठविणे अत्यावश्यक असते.
   तापात जर चढउतार असेल तर दिवसातून दोन ते तीन वेळा तरी शरीराचे तापमान घ्यावे लागते. . ताप किती, कधी चढतो आणि उतरतो यावरून रोग निदानाला मदत होते. सध्या थर्मामीटर ऐवजी डिजिटल थर्मामीटर मिळतो यात तापाचा सरळ आकडाच दिसतो. त्यामुळे ताप नेमकेपणाने मोजणे व त्यावर वेळीच योग्य ते उपचार करणे शक्य व अधिक सोपे होते. म्हणून पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणातील  बदलामुळे ताप येऊ शकतो यासाठी आपण थोडी काळजी घेणे आवश्यक असते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top